आधारवड हरपला
अचानक यमराजाने आमच्या राम बाबाला प्रश्न विचारला काय केलस तू पृथ्वीतलावर येऊन रामबाबांनी सांगितले माझा प्रवास सुरू झाला केरळमधील एका खेड्यातून तिथे जन्मलो अतिशय कमजोर अवस्थेत शेळीच्या दुधाने मला शक्ती मिळाली सात वर्षांपर्यंत पाऊलही न टाकणारा मी शेळीच्या दुधामुळे चालू लागलो आठवी पर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतानातेव्हा खूप मार पडत असे त्यामुळे मी घरातून पळालो पश्चिम बंगाल कलकत्ता व पुढे मुंबई येथे आलो कलकत्याला असताना भारत पाक फाळणी झाली मी ज्या एरियात राहत होतो तो मुस्लिम बहुल होता हिंदू-मुस्लिम कत्तल सुरू असताना मी मुस्लिम बनून माझा जीव वाचवला पुढे वातावरण निवळल्यानंतर मुंबईला आलो . नाशिक मधून त्यावेळी कांदा विकण्यासाठी गाड्या जात त्यात बसून विल्होळीला आलो तिथून पळसे येथे आलो आणि पळसेकर होऊन गेलो .
माझ्या कुठल्याही प्रकारचा रक्ताच्या नात्याची माणसे नसताना मी त्यांच्याच घरचा एक व्यक्ती होऊन राहिलो .अतिशय निरपेक्ष भावनेने त्यांच्या घरची सर्व घडी व्यवस्थित बसवली खूप काम केले . प्रसंगी इतरांशी झगडलो .
काय केले हे सर्व यमराजाला जणू आठ दिवस तो त्याची जीवनगाथा सांगत होता .ओरडून ओरडून तो थकला नाही .तर आजच्या काळातही निरपेक्ष भावनेने जगणारी व्यक्ती आहे याचे यमराजाला आश्चर्य वाटले .
आमच्या सासूबाईंची आई भागुबाई भिवाजी गायधनी या पळसे गावच्या पाटील . त्यांच्या चार मुलींपैकी ठकुबाई ही तिसरी मुलगी . दैवदुर्विलास आणि तीन मुले तीन मुली लहान असताना वैधव्याची कुऱ्हाड कोसळली .जमीन जुमला नाही . त्यावेळी तिघी बहिणींनी मिळून बक्षीस पत्राने ती जमीन या तीन भावांच्या नावावर करण्याची विनंती आईला केली . आईनेही ती मान्य केली परंतु जमीन कसण्यासाठी माणूस बळ नव्हते . तेव्हा रामा रुपी देवदूत आला . त्याने मर्जी संपादन करून जमीन कसली . जिरायती शेती बागायती केली . ठकुबाईला मात्र आईने सांगितले ," मुलगा प्रामाणिक आहे .तुझा चौथा मुलगा म्हणूनच त्याला मान." सासूबाईंनी ही तेच केले.
हळूहळू मुले मोठी होत गेली .परिस्थिती सुधारू लागली . यथावकाश आमच्या आजेसासुबाई गेल्या .त्यांच्या क्रिया कर्माची सर्व जबाबदारी रामाने पार पाडलीएव्हाना मुलींची लग्न होऊन त्या सासरी गेल्या .मुले मोठी होऊन नोकरी धंद्याला लागली . मुले-नातवंडे सर्वजण संसारात रममाण झाली .पण रामाला म्हणून सुद्धा त्याने लग्न केले नाही . तारुण्यात असताना सुद्धा त्याचा पाय घसरला नाही . तो रामा आमच्या मुलांचा मामा झाला होता . आमच्या उन्नतीत आता तो खुश होत होता . अगदी घरातल्या सारखाच . मग तिन्ही मुले वेगळी झाली .रामा आमच्यात राहू लागला .गेल्या २८ वर्षांपासून आमच्या घरातील वडीलधारी व्यक्ती आमच्या घरात राहत होती .आमचा आधार बनून परंतु त्याची प्रेमाची नजर मात्र सर्वांवर सारखीच असायची . आमचे हे सर्वात लहान . पितृछत्र तर सहा महिन्यांचे असताना हरपलेले . त्यामुळे त्याचा ओढा कदाचित यांच्याकडे अधिक असावा .
आमच्या मुलांनी तर त्याची खूपच काळजी घेतली . त्याने ही सर्वांसाठी खूप केले .छोट्या गोष्टीत आनंद शोधला .तुम्हीच माझे आई ,तुम्हीच माझे बाप, भाऊ, सर्व काही असे तो सर्वांमध्ये पाहत होता. माझ्या तिन्ही मुली इंजिनियर त्यांचा तर त्याला फार अभिमान. माझ्या मुलाचा सुद्धा त्याला अभिमान . आमच्या जाऊ बाई यांनीसुद्धा त्याला प्रेम दिले , जीव लावला .पण आजच्या काळात सखे कोणाच्या कामात येत नाहीत, किंवा वेळ आल्यावर पाठ फिरवतात. तिथे रक्ताचा नाही, जातीचा नाही, धर्माचा नाही पण मानवतेत देव शोधणारा माणूस या जन्मी आम्हाला लाभला . ( १९ ऑगस्ट ) बुधवारी त्याचा आत्मा अनंतात विलीन झाला आणि आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झालो .परंतु जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत रामाच्या आठवणी आम्हाला सदैव प्रेरणा देतील .
सर्वात शेवटी गावातील प्रत्येक स्त्रीला तो विश्वासू, प्रामाणिक वाटला. त्या सर्वांनी त्याला घरातल्या सारखीच माया आणि प्रेम दिले हे तितकेच महत्त्वाचे .त्या सर्वांचे शतशः ऋणी आहोत आणि राहू . ईश्वर त्याला मोक्ष प्रदान करेल यात तिळमात्र शंका नाही .